वकीलांची फौज तयार, आम्ही दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणारचं- दानवे

Foto

औरंगाबाद- आम्ही दिलेल्या मराठा आरक्षणाला जर न्यायालयात आव्हान दिल्या गेले, तर आमच्याकडे तज्ञ वकीलांची फौज तयार आहे. त्यामुळे आम्ही दिलेले आरक्षण कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात टिकणारचं असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी १ डिसेंबरला जल्लोष करा असे जाहीर केले होते पण त्याआधीच ही संधी आल्यामुळे सर्वांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवे असेही ते म्हणाले.

मागील सरकारने घाईगडबडीत आरक्षण दिले

नारायण राणे यांच्या समितीने दिलेले आरक्षण हे घाईगडबीत दिल्यामुळे ते न्यायालयात टिकले नाही. मात्र आम्ही पूर्णपणे अभ्यास करुन, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिलेले आहे, असे दानवे म्हणाले. मागच्या सरकारने मराठा आरक्षणाचा फक्त अध्यादेश काढला, त्याचे कायद्यात रुपांतर केले नाही. मात्र आमच्या सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करुन आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे आरक्षण दिलेले असल्याचे ते म्हणाले.

मराठ्यांना एसईबीसी मधून आरक्षण, ओबीसींनी चिंता करु नये

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला एसईबीसी मधून आरक्षण दिलेले आहे. आमचे सरकार हे ओबीसींच्या बाजूने असून त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे दानवे म्हणाले.

मुस्लिमांना आरक्षण आम्हीच दिले

मुस्लिम समाज हा सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. मुस्लिम समाजातील ५५ पोटजातींना युती सरकारच्या काळातच आरक्षण दिल्या गेले. याशिवाय भाजप सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांकरीता ज्या सवलती लागू केल्या आहेत त्या मुस्लिमांना देखील लागू आहेत. मात्र काँग्रेसने मुस्लिम समाजाचा वापर फक्त वोटबँक म्हणून केलाच्या आरोपही दानवेंनी केला.

धनगर समाजाचा एस.टी प्रवर्गात समावेश केंद्र सरकारच्या हातात

धनगर समाजाला एस.टी प्रवर्गात समावेश हवा असल्यास तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. ‘टीस’ ने दिलेल्या अहवालावर अभ्यास सुरु असून न्यायिक प्रक्रिया पार पाडूनच धनगर समाजाला आरक्षण दिल्या जाईल असे दानवे म्हणाले.